RSS

...
A title i borrowed from the book Five Point Someone by Chetan Bhagat. it sums up most of what i believe in. Its funny how words and pictures sometime reveal more than the people themselves!
...

June 28, 2011

IBM Star Performer Award - 6/24


Received this recognition from the hands of Deutsche Bank (our client) director on 6/24...i'm excited!

May 24, 2010

माझी वाचनकथा

मला वाचनाची आवड आहे पण मी फार काही चांगले, खोल, अर्थपूर्ण वाचले आहे असे नाही. कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, आत्मचरित्रे मी फारशी वाचलेली नाहीत. बऱ्याच नावाजलेल्या साहित्यिकांची नावेही मला माहीत नाहीत. ज्यांची नावे माहीत आहेत त्यांची पुस्तके मी वाचलेली नाहीत. (आग्रहाखातर काही प्रसिद्ध पुस्तके वाचल्यावर "यात विशेष काय आहे?" असे भाबडे प्रश्न मला पडतात, पण त्या पुस्तकांनी भारावलेल्या लोकांना ते प्रश्न विचारण्याचे धाडस होत नाही.) हे मी अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगतो आहे. "मला या विषयाची फारशी माहिती नाही" किंवा "मी काही या विषयातील तज्ज्ञ नाही" अशी सुरूवात करून त्याच विषयावर पुढे तासनतास बोलणाऱ्या किंवा भलेमोठे लेख/पुस्तके लिहिणाऱ्या महान लोकांसारखा कोणताही आव मला आणायचा नाही.

मी काय वाचतो? आणि का वाचतो?  ह्या प्रश्नाचे उत्तर देताना खरेच बराच विचार करावा लागला. लहानपणी वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो. वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, सिंहासन बत्तिशी, वेताळ पंचविशी, पंचतंत्र, इसापनीती वगैरे वगैरे त्यावेळची आवडती पुस्तके होती. एकच पुस्तक कितीवेळा वाचावे याचा विचार फारसा केला जात नसे. बोध, तात्पर्य, शिकवण वगैरे काही असते/असावे हे आमच्या खिजगणतीतही नसायचे. पण अजाणतेपणी का होईना पण त्या पुस्तकांनी बालमनावर केलेला परिणाम अजूनही शिल्लक आहे. ("म्हणजे? त्यानंतर तुझी मानसिक वाढ झालीच नाही की काय?" असे कुणाला वाटले तर त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे असे मला वाटते.)

माझे बालपण जिथे गेले, तिथल्या एकमेव दुकानात शाळेची पुस्तके वगळता २०/३० पानी बालकथांशिवाय इतर काही मिळत नसे. "शाळेला लायब्ररी आहे" हे वाक्य "गाईला चार पाय असतात" किंवा "सूर्य पूर्वेला उगवतो" या वाक्यांइतकेच बिनमहत्त्वाचे होते. शिवाय अभ्यासाची पुस्तके किंवा रोजचे वर्तमानपत्र वाचण्याचा देखील कंटाळा असलेल्या मित्रमंडळामुळे लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचणे हे स्वप्नातदेखील येत नव्हते. त्यामुळे घरात आधीचीच असलेली आणि भेट म्हणून मिळालेली पुस्तके ह्यावरच आमची गुजराण चालत असे.

सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्याची चिरफाड वाटे. नुसतंच वाचत जावं आणि त्यातच रमून जावं असं साधं सोपं आयुष्य असतं तर काय मजा आली असती! अनुभवाने सांगतोय, दहावीपर्यंत हे नशीब नव्हतं, पण अकरावी-बारावीत मराठी नव्हतं तरीही मी युवकभारती वाचून काढली, आणि त्या वाचनाचा आनंद अवर्णनीयच होता.

खर तर कुठल्याही वाचनाचा आनंद हा असाच असतो. ज्ञान मिळवण्यासाठीदेखील वाचावं लागतं, पण मग 'फक्त बर वाटतं' म्हणून जर एखादा वाचत असेल तर त्यातही काही चुकीचं नाही. समीक्षक, परीक्षक लोकांची मला कधी कधी कींव येते, एवढं प्रचंड वाचन, पण त्यातून काही आनंद मिळतो की नाही देव जाणे.

तर मग फक्त बरं वाटावं म्हणून वाचत गेलो आणि पुस्तकांनी पण अगदी मन मोकळं केलं. काही पुस्तकांनी हसवलं, काहींनी रडवलं, काहींनी घाबरवलं, काहिंनी अस्वस्थ केलं, काहिंनी भडकवलं आणि काहिंनी बहकवलं.. आणि आजही कोणतही पुस्तक चांगलं की वाईट हे एकाच गोष्टीने ठरत- 'त्याने मनाला हात घातला का?'

कालांतराने या नेहमीच्या पुस्तकांमध्ये अरेबिअन नाइट्स, सिंदबादच्या सफरी, रॉबिन हूड, रॉबिन्सन क्रुसो, फास्टर फेणे, शेरलॉक होम्स, "रशियन लोककथा" नावाचे एक भलेमोठे, लाल कापडी बांधणीतले पुस्तक अशी भर पडली. पुढे चिं. वि. जोशी आणि पुलं आयुष्यात आले आणि अजूनही गेले नाहीत. जातील असे वाटत नाही किंवा त्यांनी जावे असेही वाटत नाही.

पुढे तांत्रिक विषयांवरची पुस्तके वाचावी लागली. त्या पुस्तकांनी माझ्या मनावर, बुद्धीवर आणि एकूण विचारप्रक्रियेवर, वागणुकीवर बराच प्रभाव टाकला आहे. ("हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे" हे वापरून वापरून गुळगुळीत झालेले वाक्य इथे (नेहमीप्रमाणे) चपखल बसते.)

असो, नमनालाच धडाभर तेल गेल्याने आता थोडंफार त्या माझ्या प्रिय पुस्तकांबद्दल..

(बऱ्याच आधी पशाने मला टॅग केले होते त्यावेळी मी काही लिहिले नाही, त्यामुळे हे लिहिताना एक अपराधीपणाची जाणीव आहे (लिहायला काय जातेय?) )

सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा नुकतेच विकत घेतलेले मराठी पुस्तक (६ महिन्यांपूर्वी :)).
व्यंकटेश माडगुळकरांचं... माणदेशी माणसं

वाचले असल्यास, पुस्तकाबद्दल थोडेसे
:)

आवडणारी/प्रभाव पाडणारी पुस्तके

1. पुलंची मी वाचलेली सगळी पुस्तके

2. चिं वि जोशींची मी वाचलेली सगळी पुस्तके

3. व.पु. ची मी वाचलेली सगळी पुस्तके

4. ज्ञानयोग - स्वामी विवेकानंद, मराठी अनुवादकाचे नाव आठवत नाही आणि सध्या ते पुस्तक माझ्याकडे नाही.

5. मॢत्युंजय - शिवाजी सावंत

अद्याप वाचायची आहेत अशी पुस्तके
"अद्याप वाचावयाच्या पुस्तकांची" यादी मारूतीच्या शेपटीप्रमाणे, भारताच्या मतदार यादीप्रमाणे, राजकीय पक्षांच्या आश्वासन यादीप्रमाणे, माझ्याविषयी मित्रमैत्रिणींना असणाऱ्या तक्रारींच्या यादीप्रमाणे बरीच लांबलचक होईल म्हणून ती देण्याचा प्रयत्न करत नाही.


एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
बऱ्याच मुली वेगवेगळ्या कारणांनी आवडत असल्या तरी एकाच मुलीशी लग्न करता येईल हे जाणवल्यावर मनुष्य जसा खिन्न होईल तशी खिन्नता मला आता आली आहे. असो आता निवड करायचीच आहे तर सगळ्यांची गोळाबेरीज करून "गोळाबेरीज" ची निवड करावी लागेल. गोळाबेरीज हे पुलंच्या पुस्तकांपैकी माझे विशेष आवडते पुस्तक आहे. ग्रामीण जीवानाचे अविभाज्य अंग असलेली पण पुलंच्या कृपेने शहरातील सुशिक्षित लोकांच्या दिवाणखान्यातही दिमाखाने नांदणारी "म्हैस" याच पुस्तकातली. "घरमालकास मानपत्र", "बंधू आणि भगिनींनो", "सरदी" मधील निखळ विनोद, "माजघरातला स्फिंक्स", "घरगुती भांडणे", "जाल्मिकीचे लोकरामायण" मधील तिरकस विनोद. "मी नाही विसरलो", "एका दिवंगत गंधाचा मागोवा" मधील आठवणीत रमणारा विनोद आणि विशेष आवडणारे "एक नवे सौंदर्यवाचक विधान", "महाभारतकालीन वर्तमानपत्रे" आणि "माझी कु. संपादकीय कारकीर्द". एकूण काय? तर संग्रही असावेच असे हे पुस्तक.

 
समाप्त...
सागर जाधव